satyaupasak

Chandrakant Patil: आढावा बैठकीत शरद पवारांकडून संघाचं कौतुक; चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘हेच शरद पवार साहेबांचं दुर्दैव…’

Chandrakant Patil on Sharad Pawar: शरद पवारांनी संघाच्या प्रचाराचे कौतुकही केलं, त्यानंतर नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान याबाबत अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसीय आढावा बैठकी पार पडली. यावेळी लोकसभेतील चांगल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीला आपण गाफील राहिल्याची कबुली पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. विरोधकांना मिळालेल्या यशामागे संघाच्या प्रचाराचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकसभेतील घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिलो, असा समज झाला. विधानसभा हातचा मळ असल्याचा समज केला.

दुसरीकडे पराभवाची गांभीर्याने नोंद करत विरोधकांनी, संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. घरोघरी जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला आणि दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या. त्याचा परिणाम निकालाच्या रूपात त्यांना मिळाल्याचे शरद पवार यांनी भाषणातून म्हटले. शरद पवारांनी संघाच्या प्रचाराचे कौतुकही केलं, त्यानंतर नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान याबाबत अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

शरद पवार साहेबांचं दुर्दैव असं आहे…
शरद पवारांनी केलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “शरद पवार साहेबांचं दुर्दैव असं आहे, त्यांनी स्तुती केली तरी सुद्धा तुम्हाला शंका येते, त्यांनी टीका केली तरी तुम्हाला शंका येते. पण ते मात्र खमके आहेत. तुम्ही त्यांना काही म्हणा ते याही वयात कामच करत असतात. त्यांनी स्तुती केली तर चांगलं आहे. तुम्ही त्यांच्याकडे ‘का स्तुती केली?’ अशा संशयाने का बघताय?” असा सवाल चंद्रकांत पाटलांनी मिश्किलपणे पत्रकारांना केला.

नेमकं काय म्हणालेत शरद पवार?
राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकुशलतेचं व संघटनाचं कौतुक केलं. शरद पवारांकडून संघ परिवाराकडून सूक्ष्म पद्धतीने सुरू असलेल्या कामाचा भाषणातून उल्लेख करण्यात आला.

संघ परिवाराकडून कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची 20 वर्षे घेतली तरी त्यांना वाऱ्यावर न सोडता योग्य ठिकाणी आयुष्यभरासाठी समायोजन केलं जात असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी त्यांनी पुणे शहराचं उदाहरण दिलं. पुण्यासारख्या शहराची विद्येचे माहेरघर म्हणून ओळख आहे. मात्र, याच शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक काम करत आहेत.

फर्ग्युसन महाविद्यालय, एसपी महाविद्यालय, मॉर्डन कॉलेज, एमईएस कॉलेजवर संघाचे कार्यकर्ते आहेत. अशा संस्थांवर अनेक वर्षे बाहेरच्या राज्यात संघासाठी काम करून पुन्हा माघारी आलेल्या लोकांना बसवलं जातं आणि त्यांची आयुष्याची योग्य सोय लावली जात असल्याचे शरद पवारांनी आढावा बैठकीदरम्यानच्या भाषणात सांगितले.

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *